मुंबई (प्रतिनिधी) : मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यध नाना पटोले यांनी केला असला तरीही तो धादांत खोटारडेपणा आहे, असा आरोप भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. नाना पटोलेनी त्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे आव्हान भंडारी यांनी दिले आहे.

स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे. अशी चपराक भंडारी यांनी लगावली आहे. तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे, असेही भंडारी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना मी मारू शकतो, असे वक्तव्य केल्याप्रकरणी  नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांना अटक करण्याची मागणी केली आहे.