कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरूंदवाड शहरामध्ये गेल्या ५० वर्षापासून पालिकेच्या जागेवर भुई-भाड्याने नागरिक रहात आहेत. त्यांना प्रशासनाने जागा रिकामी करण्यासाठी दिलेली नोटीस अन्यायी आहे. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई तत्काळ थांबवावी. त्यांची अतिक्रमणे नियमित करावीत, अशी मागणी करून नागरिकांची एक इंचही जागा जाऊ देणार नाही. अतिक्रमण धारकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी सांगितले.

कुरूंदवाड पालिकेतर्फे मुदत संपलेल्या भुई-भाडे धारकांना जागेच्या कराराची मुदत संपली असून जागा पालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी नोटीस लागू केल्याच्या निषेधार्थ माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी डांगे बोलत होते. माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उदय डांगे, दयानंद मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी डांगे म्हणाले की, भुईभाडे धारकांना पालिकेने दिलेल्या नोटिशीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांच्या जागा काढून घेतल्यास सर्वांचे संसार उघड्यावर पडणार आहेत. त्यामुळे नागरिकांतून आक्रोश निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. तसेच २०१६ व २०१८ सालच्या शासन निर्णयाप्रमाणे भुईभाडेधारकांची अतिक्रमणे नियमित करावीत, अशी मागणी केली.

यावेळी पालिका कार्यालय निरीक्षक पूजा पाटील, प्राची पाटील यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना अधिकाऱ्यांना कळवू, असे आश्वासन दिले.

या मोर्चात रणजीत डांगे, सिद्धाप्पा कब्बूरे, रमेश खराडे, मुन्ना फल्ले, तानाजी शिकलगार, अमित पाटील, रमेश गोंधळी, सुधाकर तावदारे, आप्पासाहेब गावडे, मनोहर गोंधळी, संजय कुरुंदवाडे, संजय दाभाडे, दिगंबर कदम, रणजित गोंधळी, तानाजी गोंधळी आदींनी सहभाग घेतला.