कोल्हापूर (प्रतिनिधी)  : ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.  

मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, एन. डी. पाटील विधीमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होती. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहिल.

लोकनेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना.