कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  उदं..ग आई उदं..यल्लमाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेला करुंदवाडमधील भाविक पायी रवाना झाले. यावेळी रेणुका देवीच्या पालख्या, बैलगाड्या असंख्य भक्तांच्या सोबतीने हलगी-खेताळाच्या निनादात भक्तिमय वातावरणात रवाना झाल्या.

कुरुंदवाडमधून सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेला बैलगाडीने आणि पायी चालत जाण्याची शंभर वर्षांपासूनची परंपरा आहे. यावेळी रेणुका देवीच्या यात्रेसाठी येथील यल्लमा देवालयातून फुलांनी सजविलेला देवीची पालखी मिरवणुकीने आज (रविवार) रवाना झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरातून रेणुकादेवीच्या पालखी सोबत अकरा बैलगाड्या आणि भक्तगणांचा पायी प्रवास सुरू झाला आहे.

कुरुंदवाड ते सौंदत्ती यात्रेचा दिडशे किलोमीटरचा पायी प्रवास आहे. चिकोडी, गोकाक,मनोळी ते सौंदत्ती या ठिकाणी तिसऱ्या दिवशी वस्ती आहे. हा एकुण नऊ दिवसांचा प्रवास असून पाचव्या दिवशी पहाटे ही यात्रा परतीच्या प्रवासाला लागणार आहे. तर नवव्या दिवशी कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे दुपारी रेणुकादेवीच्या जगाचे आगमन होणार आहे.

यात्रेसाठी यल्लमा देवालयाचे पुजारी रावसाहेब चव्हाण, अमृत चव्हाण, अमोल चव्हाण, लता चव्हाण, राजू आवळे, आयुब पट्टेकरी, दादासाहेब गायकवाड, मुन्ना बागवान, बेबी पट्टेकरी, सुरज पट्टेकरींसह आदी भक्तगण रवाना झाले आहेत.