कोल्हापूर (प्रतिनिधी) : अलिशान गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला विशेष पोलीस पदक देवून सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा नेते सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शिरोली पोलीस ठाण्यातील स्वीप्ट गाडी चोरीचा  गुन्हा दाखल होवून त्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अति जलदगतीने करत कोदाळी ता. चंदगड येथे छापा टाकून तीन आरोपी सह ५ कोटी ५ लाख किंमतीच्या अलिशान कार जप्त केल्या. याबद्दल पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, विनोद कांबळे, सुरेश पाटील, राम कोळी, असिफ कालयागर यांचे कौतुक होत आहे.

तरी या सर्व टीमला येत्या २६ जानेवारी रोजी विशेष पोलीस पदक देवून गौरवण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रविण निगवेकर, प्रविण आजरेकर, सलमान मौलवी, बैजू कांबळे यांनी केली आहे.