गारगोटी (प्रतिनिधी) :   गेल्या दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये भाग घेतलेल्या कामगारांना चार दिवसांपूर्वी एसटी प्रशासनाने कारवाईची नोटीस दिल्या आहेत. यामुळे आलेल्या नैराश्येतून गारगोटी आगाराच्या एसटी चालकाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. धनाजी मल्हारी वायदंडे (वय ३९ रा. नाधवडे, ता. भुदरगड) असे या चालकाचे नाव आहे.

जोपर्यंत बसस्थानक प्रमुखावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणेत येत नाही तोपर्यंत या बस चालकाचे प्रेत ताब्यात घेणेस व शवविच्छेदन करण्यास नकार देत भुदरगड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून एस टी कर्मचाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्यांचे कुटूंबियांसह ठिय्या आंदोलन केले.

या घटनेनंतर गारगोटी आगारातील सर्व कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांनी बसस्थानक प्रमुख, आगार प्रमुख यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दारातच ठिय्या मारला. आगार प्रमुख ठोंबरे व दडपशाही करणाऱ्या बस स्थानक प्रमुख रुपाली तोंदले यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.