कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे खोटे दाखवून मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवली. यात मुंबई बँक व लाखो ठेवीदारांची फसवणूक त्यांनी केली आहे, असा आरोप करत आम आदमी पक्षाच्या वतीने एमआरए पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरेकर हे गेली अनेक वर्षे मुंबई जिल्हा सहकारी बँकचे चेअरमन म्हणून काम करत आहेत. ते प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेच्या माध्यमातून मजूर वर्गांतर्गत निवडून आले आहेत. विभागीय सहनिबंधक यांनी ३ जानेवारी २०२२ च्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, महाराष्ट्राचे आमदार असताना प्रवीण दरेकर यांनी कामगार असल्याचे भासवून शासनाची आणि मुंबई जिल्हा सहकारी बँकेची फसवणूक केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते आणि त्यांच्या कुटुंबाकडे २.१ कोटींपेक्षा जास्त किमतीची जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. ते एक व्यापारी असून एक आमदार आणि विरोधी पक्षनेता म्हणून, त्यांना अनेक फायदे मिळतात. त्यांना प्रति महिना २.५ लाख रुपये मानधन मिळत असताना त्यांना कोणत्याही शक्यतेनुसार मजूर म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, ज्यामुळे त्यांचे मजूर संस्थेचे सदस्यत्व पूर्णपणे बेकायदेशीर बनते. आ. दरेकर यांनी हजारो बँक ठेवीदार आणि सोसायटीच्या सदस्यांची फसवणूक केल्याबद्दल त्यांना अटक करावी, अशी मागणी आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.