कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समन्वयाने सोडवूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होऊन यावर्षी घळभरणी होऊन, पाणी अडविले जावे, ही येथील शेतकऱ्यांची भावना असल्याचे ते म्हणाले.

उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या व प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी अधिकारी उपस्थित होते.

ना. मुश्रीफ म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होऊन यावर्षी घरभरणी व्हावी ही सरकारची आणि शेतकऱ्यांचीही अपेक्षा आहे. पुनर्वसना संबंधी असलेल्या समस्या निकालात काढूच. दरम्यान घरभरणीसाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीत अधिकारी आणि धरणग्रस्त यांच्यामध्ये कुटुंब संस्थेची व्याख्या, निर्वाह क्षेत्र पॅकेज, मोबदला पॅकेज, जमीन हस्तांतरण अशा मुद्यांवर मतभेद होते. ना. मुश्रीफ यांनी अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याने एकत्र बसून अशा मुद्द्यांवर चर्चा करून आजच्या आज अहवाल द्या, अशा सूचना केल्या.

यावेळी केडीसीसी बँकेचे नूतन संचालक सुधीर देसाई, आजरा पं. स.चे सभापती उदयराज पोवार, माजी सभापती अल्बर्ट डिसोजा, विष्णुपंत केसरकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चाफवडेचे सरपंच विलास धडाम, राजू होलम, शेतकरी उपस्थित होते.