कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्टोन क्रेशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी ११ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी साडेपाच लाखांची लाच घेताना फराळे (ता. राधानगरी) येथील सरपंच संदीप डवर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना ताब्यात घेण्यात आले.  मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज (रविवार) सापळा लावून कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराचा फराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टोन क्रेशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रेशरचा त्रास होत असल्याचे कारण देत सरपंच डवर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रारदार याला क्रेशर का बंद करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली होती. तसेच या नोटिशीच्या आधारे प्रांताधिकारी प्रधान यांनीही नोटीस बजावली होती. दरम्यान, ही कारवाई टाळण्यासाठी सरपंचाने स्वतःला दरमहा एक लाख रुपये आणि प्रांताधिकारी प्रधान यांना १० लाख रुपये अशी लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने आज सकाळी प्रांताधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सरपंच यांनी आपल्यासाठी १० लाखाची मागणी केल्याचे सांगितले. यावर प्रांताधिकार्‍यांनी  सरपंच यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. दरम्यान, आज दुपारी २ वाजता सरपंच डवर प्रांताधिकारी कार्यालयाजवळ पैसे घेण्यासाठी आले होते. यावेळी साडेपाच लाखांची लाच घेताना सरपंचाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातून प्रसेनजित प्रधान यांनाही ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने केली. या प्रकरणी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.