कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आठ दिवसात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वाहने व बंद खोक्याचे अतिक्रमण हटविणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने आज (शुक्रवार) अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेकांनी आपली बंद असलेली आणि वाहतुकीला अडथळा करणारी वाहने लावली आहेत. अनेकांच्या खोक्याचेही रस्त्याकडेला अतिक्रमण आहे. बाजारपेठेत नागरिकांच्या आलिशान गाड्यांचे ही रस्त्यावरच अतिक्रमण असल्याने नागरिकांना, व्यापाऱ्यांना अडथळा ठरत आहे. काही व्यापाऱ्यांनी पालिकेत याबाबत थेट तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासक जाधव यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरवात केली आहे. लवकरच नवबाग रस्त्यावरील हातगाडे आणि बाजारपेठेतील रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांच्या अतिक्रमणावर हातोडा घालणार आहेत.

तसेच शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही हे अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासक जाधव यांनी सांगितल्यामुळे हे पथक कोणाकडे वळणार याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. यावेळी पालिकेचे निरीक्षक राजाराम गोरे, नंदकुमार चौधरी, विक्रम हेगडे, सागर लाड, संतोष कांबळे यांच्या पथकाने जुना बसस्थानक रस्त्यावरील अतिक्रमण असलेली खोकी हटवली.