कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये एका जीवघेण्या संकटातून सुखरूप बचावले. याचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (गुरुवार) मुंबईत मुंबादेवीचे दर्शन घेतले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर गेले असताना एक फ्लायओव्हरवर त्यांचा ताफा अडकला. तेथून पाकिस्तानची सीमा केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान फ्लायओव्हरवर वीस मिनिटे होते. त्यावेळी कोठूनही हल्ला होण्याचा धोका होता. पंजाबमधील काँग्रेस सरकारमुळे हे संकट ओढवले. पण मोदीजी सुखरूप वाचले. त्याबद्दल देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि मोदीजींना दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करण्यासाठी आपण मुंबादेवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले.

तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पंतप्रधानांच्या विषयी केलेल्या टीकेवर, नाना पटोले कधीच गंभीर नसतात आणि कोणी त्यांची गंभीर दखलही घेत नाही. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांचे म्हणणे किमान ऐकले जात असल्याचे चंद्रकांतदादा यांनी सांगितले.