कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता देशामध्ये असलेल्या विविध हस्तकला आणि त्या माध्यमातून मिळणारा व्यवसाय उभा केला. तर देश निश्चितच प्रगतीपथावर जाईल. यासाठी आपल्या कला जोपासाव्यात व त्याचे जतन करावे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी आज (गुरूवार) केले.

केंद्र शासनाच्या हस्तकला विभागातर्फे कदमवाडीतील भारती विद्यापीठाच्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये तीनदिवसीय क्राफ्ट अवेरनेस प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माने बोलत होते.

हस्तकला विभागाचे सहायक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी शाळेमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केली. त्याला या शाळेने त्वरित प्रतिसादही दिला. येथे उभारलेल्या हस्तकलेच्या विविध दहा स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावरील प्रशिक्षण, प्रात्यक्षिक तर मिळेलच शिवाय त्यांच्यासाठी ड्रॉईंग व निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मुख्याध्यापिका नसीमा रहेमान यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. रावसाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी भारती विद्यापीठाचे डॉ. एच. एम कदम, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आर. व्ही कंठे,  इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. घोरपडे आणि डॉ. मीनाज कुलकर्णी आदीसह  विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हस्तकलेचे कलाकार उपस्थित होते.