कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात ओमीक्रॉन ‘व्हेरीएंट’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वैद्यकीय सुविधांसह योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी आज (मंगळवार) हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोनाच्या नवा ‘व्हेरीएंट’मुळे पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात रूग्णवाढीचा धोका वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात असणार्‍या आरोग्य सुविधा, उपलब्ध रुग्णालये, ऑक्सिजनची आवश्यकता,  डॉक्टर-परिचारिका या सर्वांचाच आढावा घेणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदी नियमांचे पालन करण्यासाठी कठोर कारवाई करावी.

सीपीआर  रुग्णालयातील मंजूर असलेली २८ रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत,  नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रवृत्त करावे,  परराज्यातून विशेषत: गोवा आणि कर्नाटक राज्यातून येणार्‍यांना आरटीपीसीआर  चाचणी सक्तीची करावी, कोरोनावरील सर्व उपचार नागरिकांना विनामूल्य, वेळेत मिळावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी शिवसेनेचे किशोर घाटगे, सुशील भांदिगरे,  सुनील पाटील,  महादेव पाटील, हिंदु एकताचे चंद्रकांत बराले,  हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे  आदी उपस्थित होते.