आजरा (प्रतिनिधी) : गेल्या सहा वर्षात शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्हा बँकेचा कारभार केला. यापुढेही खावटी व मध्यम मुदत कर्जाचा व्याजदर कमी करून शेतकरी वर्गाला दिलासा देणार असल्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (रविवार) येथे दिले. आजरा येथे आयोजित जिल्हा बँक निवडणुकीच्या  मेळाव्यात  ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

ना. मुश्रीफ म्हणाले  की, आजरा तालुक्यात स्व.राजारामबापू देसाई यांनी जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अतिशय चांगले काम केले  आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला आमच्या पॅनेलमधून  उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करून बापूंना आदरांजली व्हावी, असे आवाहन  त्यांनी मतदारांना केले.  आजरा कारखान्यासाठी आर्थिक पुरवठा करण्यासाठी बँक हिमालयासारखी उभी राहील, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील सहकार आज बँकेमुळे टिकून आहे.  बँक सक्षम असेल, तर शेतकरी सक्षम  होईल. गावागावात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी बँक महत्वाची आहे, गावातील विकास सोसायट्या आर्थिक कणा आहेत.  यापुढेही शेतकरी व गोरगरिबांसाठी बँकेचा कारभार करू, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी खा. निवेदिता माने,  आ. प्रकाश आवाडे,  भय्या माने,  उमेश आपटे यांनी मनोगत व्यक्त केले.  आ. राजेश पाटील, राजूबाबा आवळे, मदन कारंडे, सभापती उदय पवार, जितेंद्र टोपले, संग्रामसिह कुपेकर,  विद्याधर गुरबे,  दीपक देसाई, राजू होलम आदीसह इतर गटातील महिला उमेदवार उपस्थित होत्या. मारुती घोरपडे यांनी  आभार मानले.