कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष,  नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यामुळे आजपासून (शुक्रवार)  प्रशासकराज सुरु झाले असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.  तर पुढील नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक होईपर्यत प्रशासक  कारभार पाहतील.

डिसेंबरअखेर पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत,  अशी भूमिका राजकीय पक्ष व संघटनांनी घेतल्याने निवडणुका होणार की पुढे जाणार याबाबत अनिश्चितता आहे. सध्या कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये तिसऱ्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

पालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे नेतृत्व मान्य करत राजर्षी शाहू आघाडीची रणनीती आखली आहे. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील हे राज्यमंत्री डॉ. पाटील-यड्रावकर यांचे निकटवर्तीय असल्याने डांगे-पाटील आघाडी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे दीपक गायकवाड आणि शेकापचे अजित देसाई यांनी रणनीती आखत राष्ट्रवादी आणि घटक पक्ष, संघटनांना एकत्रित करून डांगे-पाटील यांच्या संभाव्य आघाडीला शह देण्यासाठी मोट बांधायला सुरवात केली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. राजर्षी शाहू आघाडी, काँग्रेस-शेकाप महाआघाडी, शिवसेना एकमेकांविरुद्ध लढणार की सर्वपक्षीय कार्यकर्ते आपापले हितसंबंध जपण्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अशा रीतीने निवडणुकीला सामोरे जाणार. हे निवडणुकीवेळी  समजेल.  परंतु  संभाव्य निवडणूक मात्र अनेकांचे अंदाज चुकविणारी ठरणार आहे.