राधानगरी (प्रतिनिधी) : सर्वांना सोबत घेत गोकुळ निवडणुकीत शिवसेनेने आघाडीला पाठिंबा दिला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालक मंत्री सतेज पाटील यांनी  नेतृत्व करत पॅनेल निवडून आणले. मग त्यावेळी शिवसेनेने रांगोळ्या काढल्या का ?, असा सवाल करत शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. तुरंबे (ता. राधानगरी) येथे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

मंडलिक म्हणाले की, जिल्ह्यातील निवडणुकांत सेनेला भरभरून दिले, असे मंत्री मुश्रीफ म्हणतात. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांची झोळी भरून फाटेल एवढे सेनेने दिले. ते देताना आमचे हातही काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सेनेचा फक्त वापर होत असल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. चांगले काम केलेल्या संचालकांना कुणाच्या तरी हट्टापायी उमेदवारी देताना बाहेरचा रस्ता दाखवला, असे मंडलिक म्हणाले.

यावेळी आ. प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी. आ. सत्यजित पाटील – सरूडकर, माजी.आ. संपतराव पवार-पाटील यांची भाषणे झाली. सुजित मिणचेकर, नंदकिशोर सूर्यवंशी, मुरलीधर जाधव, मारूतराव जाधव, हंबीरराव पाटील, अर्जुन आबिटकर, अशोक फराकटे, अरुण जाधव आदी उपस्थित होते.