कळे (प्रतिनिधी) : पडसाळी (ता.पन्हाळा ) येथील लघुपाटबंधारे तलावात काल (रविवार) पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडलेल्या त्या दोघांचे  मृतदेह आज (सोमवार) तब्बल वीस तासांनी सापडले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने हे मृतदेह बाहेर काढले.

काल गांजवे आणि होगाडे  कुटुंबातील दहाबारा सदस्यासह पडसाळी तलाव परिसरात आले होते. यावेळी तलावाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ओम महेश गांजवे (वय १३, रंकाळा टॉवर, कोल्हापूर) आणि ऋषीकेश नंदकुमार होगाडे (वय २७, रा. इचलकरंजी)  हे  खोल पाण्यात  बुडाले होते.  काल त्याचा  शोध घेण्यात आला होता पण अंधार पडल्यामुळे शोध मोहीम  थांबवली होती.  आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने कॅमेरे आणि गळाच्या साहाय्याने दुपारीच्या सुमारास हे मृतदेह बाहेर काढले.

यावेळी कळे पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रमोद सुर्वे, जिल्हा आपत्ती पथकाचे प्रमुख सुनिल कांबळे, बाजारभोगाव मंडल अधिकारी बी.एस.खोत, तलाठी अनिल पर्वतेवार, कोलिकचे पोलिसपाटील संजय पाटील आदी उपस्थित होते.