पुणे (प्रतिनिधी) : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडावून नव्हे, तर समजावून सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी आज (शनिवार) केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोईसुविधा द्यायलाच हव्यात,  अशीही मागणी त्यांनी केली.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ची सुरुवात चंद्रकांत  पाटील यांनी त्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात एका घरात संपर्क साधून केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत  पाटील म्हणाले की,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परखडपणाचा अभिमान आहे. पण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण डोक्यातून काढून टाका असे धुडकावल्यासारखे सांगू नये. विलीनीकरण का शक्य नाही, हे समजून सांगावे. जीवन प्राधिकरणाचे विलीनकरण केले, तरी एसटीचे का करता येत नाही, हे सुद्धा समजून सांगावे.  टीईटी, आरोग्य विभाग, म्हाडा अशा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. त्यामुळे याचा तपास सीबीआयमार्फेत करण्याची मागणी  करून  दोषीमध्ये भाजपचा कार्यकर्ता आढळला, तरी त्यालाही शिक्षा करावी.  पक्ष कोणाही दोषी व्यक्तीला पाठीशी घालणार नाही,  असे त्यांनी स्पष्ट केले.