गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथील अथणी शुगर्सकडून अंतुर्ली ग्रामपंचायतीचा सन २०१६-१७ पासुन थकीत असलेला  कर भरण्यात आला. या थकीत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांनी साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली होती. पण भुदरगडच्या तहसीलदारांनी यात यशस्वी शिष्टाई केल्यानंतर कारखान्याने ग्रामपंचायत कर भरला. त्यामुळे ग्रामस्थांनी कारखाना व भुदरगड प्रशासनाचे आभार मानले आहेत.

थकीत ग्रामपंचायत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांच्या ऊस वाहतूक रोखण्याच्या आंदोलनानंतर भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी तहसील कार्यालयात ग्रामस्थ व कारखाना व्यवस्थापन यांची बैठक घेतली. यामध्ये भुदरगडचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, अथणी शुगर्सचे  जनरल मॅनेजर चंद्रकांत पाटील, चीफ इंजिनीअर नामदेव भोसले, अंतुर्लीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली.

या चर्चेत निर्णयाप्रमाणे अथणी शुगर्स प्रशासन कारखान्यात आल्यापासून २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीतील संपूर्ण थकीत रकमेपैकी ३८,५१,०७५ इतक्या रकमेचा धनादेश २२/१२/२०२१ रोजीचा आणि उर्वरीत ३८,५१,०७५ इतक्या रकमेचा धनादेश २२/०१/२०२२ या तारखेचा असे दोन धनादेश देण्यात आले आहेत. कारखान्याने थकीत कर भरल्यामुळे अंतुर्ली ग्रामस्थांनी अथणी शुगर्स आणि भुदरगड प्रशासनाचे आभार मानले आहेत.