कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आवारातील संरक्षण भिंत गेल्या एक वर्षापासून ढासळलेल्या अवस्थेत आहे. मात्र, याकडे शालेय प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

ही शाळा एका टेकडीवर असून येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. तसेच  मुख्य रस्त्यापासून सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीवर ही शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत सभोवती संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत. पण सध्या शाळेच्या एका बाजूकडील दहा ते पंधरा फूट संरक्षक भिंत पुर्णपणे ढासळलेली असून विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.

ही भिंत बांधण्यासाठी जून २०२१ मध्ये दगडे टाकले असून गेली सहा महिने ती आहे त्या अवस्थेतच आहेत. त्यामुळे येथे विद्यार्थी खेळत असताना विद्यार्थ्यांना शारीरिक इजा होऊ शकते. तसेच अनेक विद्यार्थी या दगडावर बसून खेळत असतात. संरक्षक भिंत नसल्याने एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यामध्ये जखमी होऊ शकते.  स्थानिक प्रशासन आणि शालेय प्रशासनाला या भिंतीविषयी विचारले असता दोघांनीही हात वर केले आहेत.

तर भविष्यात एखादा अपघात झाल्यावरच संबंधित प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि पन्हाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.