कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप व सहयोगी पक्षांना सन्मानजनक ५ जागा दिल्यामुळे भाजप सत्ताधारी आघाडी सोबत राहणार असल्याची माहिती भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व माजी खासदार धनंजय महाडिक व जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुकीत सत्ताधारी आघाडीमध्ये थेट चार उमेदवार आहेत. त्यामध्ये पतसंस्था गटातून भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे व इतर मागासवर्गीय गटातून जनसुराज्य पक्षाचे विकास माने व प्रोसेसींग गटातून प्रदीप पाटील यांचा समावेश आहे. हातकणंगले सेवा संस्था गटातून माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशा चार जागांसह निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत १ जागा अशा एकूण पाच जागा भाजप व सहयोगी पक्षांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीसोबत राहणार आहे. या उमेदवारांसह सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप या निवडणुकीमध्ये ताकतीने या आघाडीसोबत राहणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.