कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,गुरुदेव दत्त महाराज की जयचा नामजप आणि जयघोषात येथील दत्त मंदिर चिलखी विभाग, राजवाडा दत्त मंदिर,ढेपणपूर दत्त मंदीरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भजन कीर्तनाच्या नादात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे दत्त जयंती साजरी करता न आल्याने शहरातील मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कुरुंदवाड बस डेपोच्या अवघ्या तीनच एसटी सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. तर वडाप व्यवसाय जोमात सुरू होता. कर्नाटक राज्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून बैलगाडी, घोडगाडीने तर काही भाविक चालत येत दत्त दर्शनासाठी दाखल झाले.

येथील ढेपनपूर दत्त मंदिर येथे जीर्णोद्धार पूर्ण झाल्याने नुतन वास्तूमध्ये श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. याला कुरुंदवाड परिसरातल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जन्मकाळ सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद  वाटण्यात आला. तर ढेपनपूर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राजवाडा दत्त मंदिरातही भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधानगरी,हातकणंगले इचलकरंजीसह सांगली जिल्ह्यात एसटी बसेस बंद असल्याने बहुतांश भक्तांनी खाजगी वाहनाने तर दुचाकीने दर्शनासाठी गर्दी केली होती. दत्त जन्म काळ सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सन्मित्र चौक,शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी रात्री दत्त दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी चहा,अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी, कॉलनीतील बालचमूंनी दिंड्या काढल्या होत्या.कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील भाविक घोडागाडी,बैलगाडीने दत्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोडागाडी, बैलगाडी लावण्याची व्यवस्था कृष्णाघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मळी शेतात करण्यात आली होती.