मुंबई (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आधीच्या रचनेप्रमाणे ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर रोजीच मतदान होईल. मात्र, ज्या जागांवर ओबीसी आरक्षण होते, त्या २७ टक्के जागा आता अनारक्षित म्हणून जाहीर केल्या असून त्या जागांसाठी पुढील महिन्यात १८ जानेवारीरोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.  

या निवडणुकीच्या मतदानाची तारीख २१ डिसेंबर होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मतदानाच्या तारखांमध्ये बदल झाला असला, तरी मतमोजणी मात्र सर्व १०० टक्के जागांसाठी एकाच दिवशी म्हणजेच १९ जानेवारी रोजी होणार आहे, असेही मदान यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणावर निर्णय न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. तर राज्य सरकारने निवडणुकां पुढे ढकलण्याची मागणी करत तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला होता. मात्र, आता निवडणूक आयोगाने आरक्षणाशिवाय संबंधित २७ टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारीत तारीख जाहीर केली आहे.