कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेमध्ये एकतर्फी, मनमानी अन्यायकारक हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. सभासदांची म्हणून बँक टिकवण्यासाठी छत्रपती पॅनेलला विजय करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पॅनेल प्रमुख अमित अवसरे यांनी केले. ते सभासदांच्या मेळाव्यात बोलत होते.

अवसरे म्हणाले की, विरोधातील दोन्ही पॅनेल एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना खड्यासारखे बाजूला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलच्या उमेदवारांनी गेले महिनाभर रात्रीचा दिवस केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्हे पिंजून काढून सभासदांच्या समोर यांचा गैर कारभार पोहोचवला आहे. आपले सतरा मुद्दे सादर केले आहेत. हे मुद्दे आजअखेर कोणत्याही पॅनलने केले नाहीत. प्रचार दौरा करीत असताना सर्व सभासदांनी आम्ही बदल करणारच अशी प्रतिज्ञा आपल्यासमोर घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

सक्तीने कमी केलेल्या शाखाधिकारी व कर्मचारी यांना न्यायालयाचे आदेशनुर आपण न्याय देणार  आहोत. बँकेत सत्ता प्राप्तीनंतर सामान्य सभासदांच्या सर्वांगीण विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून सांस्कृतिक सभागृह लवकरच उभे करु. दिवसागणिक व्याज आकारणी असल्यामुळे सभासदांनी काढलेले कर्ज फिटता फिटत नाही मुद्दल आहे तशीच राहते. हे अर्थ गणित सोडवण्यासाठी महिन्याला व्याज आकारणी पद्धत अवलंबणार असल्याचे सांगितले. कर्ज प्रक्रिया सुलभ व योग्य राबवणार, बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सभासदांच्या भेटीला कार्यालयात हजर राहून सभासदांनी सुचवलेल्या सूचनांचे पालन करणार. तसेच सभासद बंधू भगिनी, मावळ्यांनी जागे होऊन नारळ चिन्ह लक्षात ठेवून न्याय द्यावा असेही आवाहन केले.

यावेळी पॅनेलचे उमेदवार राजेंद्र सावंत, श्रीकांत कोरवी, प्रकाश महाडेश्वर, शिवाजीराव फराकटे, तानाजी पाटील, मीनाक्षी शिंदे, उमेश सावंत,अनिल सरदेसाई, अमर वेटाळे, रत्नमाला शिंदे, प्रा.श्रीमंती पाटील, शैलेश सुतार, राजाराम गंधवाले, अनिल कामते उपस्थित होते.