कुरुंदवाड (प्रतिनिधी)  : समाजात गुन्हेगारी अवैधधंदे, गावगुंड, मुलींची छेडछाड व नागरिकांचे घरगुती  प्रश्न यामुळे असंतोष निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.  तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्यावरील घरगुती अन्याय नष्ट करण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावागावातील नागरिक-ग्रामस्थांच्या गावातील आणि घरगुती अडचणी सोडवून शांतता, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नागरिकांशी संवाद साधून समुपदेशन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार ‘गावभेट व कोपरा सभा समुपदेशन’  हा उपक्रम सुरू  करण्यात आला आहे. या उपक्रमातर्गंत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शिवतीर्थ येथे नागरिकांशी संवाद साधताना भांगे बोलत होते.

भांगे म्हणाले की, पोलिस ठाण्यात सण-उत्सव, निवडणुका यानिमित्ताने बोलावलेल्या  बैठकांना केवळ समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतात. समाजातील तळागाळातील नागरिक आणि महिला भगिनींना उपस्थित राहता येत नाही. अशा उपेक्षित लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस ठामपणे त्याच्या पाठीशी राहणार आहे. कोणत्याही अडीअडचणी व आपल्यावरील अन्यायाबाबत अशा लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आर. आर. पाटील,  महिपती बाबर,  अल्ताफ बागवान यांनी शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग, वर्दळीच्या ठिकाणी महिलांना वाटणारी असुरक्षितता आणि महाविद्यालयीन रस्त्यावरील टवाळखोरी याबाबतच्या समस्या मांडल्या.

यावेळी उपनिरीक्षक किशोर खाडे, फारूक जमादार, ज्येष्ठ कायदेतज्ञ  व्ही. एस. सुतार   आप्पासो मठपती,  प्रकाश जिवाजे,  सुधीर वसगडेकर,  स्मिता वसगडेकर, लालू डांगी, राजरतन कुडचे, अंकुश सोनारे,  चंद्रकांत मगदूम,  पुंडलिक हट्टी, अजित बिडकर, अजित हंसी,  हरिबा शेडबाळे, राजेखान पठाण आदी उपस्थित होते.