कुरुंदवाड (प्रतिनिधी) : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली आहे. महावितरणच्या या पठाणी वसुली विरोधात आंदोलन अंकुश आवाज उठवणार असून विजबिले व त्यावर आकारले जाणारे व्याज याचा पदार्फाश केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशचे दीपक बंडगर यांनी दिला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या होणार्‍या मुस्कटदाबीला वाचा फोडण्यासाठी आंदोलन अंकुशने आक्रमक भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन काळातून नागरिक सावरत नाही, तोच थकित बिले वसुलीकरिता महावितरणने ग्राहकांच्या मागे जवळपास ७ ते ८ महिन्यांची बिले भरा, असा तगादा लावला आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशातच महावितरणकडून अवाच्या सवा बिल आकारून पठाणी वसुली सुरु केली आहे. यामुळे ग्राहक आणि वसुली अधिकार्‍यांमध्ये खटके उडण्याच्या घटना समोर येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य लोकांना दमदाटी करून वीज बिल वसुली केली जात आहे. बड्या लोकांचे कनेक्शन तसेच ठेवून सर्वसामान्य लोकांचे कनेक्शन कट करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्याविरोधात शांत बसणार नाही. तसेच थकित बिलावर १७ टक्के व्याजाची पठाणी वसुली खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही बंडगर यांनी दिला आहे.