कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील पुररेषेत १९९० साली आलेल्या महापुरामुळे स्थलांतर केलेल्या अनेक कुटुंबांनी स्थलांतरित घरे नोटरी कराराने विक्री व भाडेतत्वावर देऊन पुन्हा कुरुंदवाड येथे पुररेषेत अतिक्रमण केले. तसेच दोन्ही ठिकाणी जागेचा कब्जा ठेवल्याचे महसूल विभागाच्या सर्व्हेत पुढे आले आहे. त्यामुळे दोन्हीकडे हक्क सांगणाऱ्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान महसूल प्रशासनाने १९९० साली २३० नागरिकांचे स्थलांतर केल्याची यादी पालिकेकडून प्राप्त करत स्थलांतर व पुनर्वसनासाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी केली असता बहुतांशी स्थलांतरित नागरिकांनी दुसऱ्यांदा स्थलांतरासाठी प्रस्ताव सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने महसूल प्रशासन गांभीर्याने अहवाल तयार करायला सुरुवात केल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

२०१९ सालच्या पुररेषेतील पुरग्रस्तांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने महसूल प्रशासनाने प्रस्तावधारक आणि १९९० सालच्या महापुरात गोठणपूर, गोंधळी-बागडी गल्ली, शिकलगार वसाहत, मोमीन गल्ली आदी परिसरातील २३० पुरग्रस्तांचे तेरवाड येथील गट क्रमांक ५४४ या महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर गंगापूर या नावाने उपनगराची स्थापना केले. पुनर्वसन केलेल्या नागरिकांची महसूल प्रशासनाने पालिकेकडून ठराव आणि यादी प्राप्त करून घेत यादी व प्रस्तावधारकांची छाननी करून स्थळ पाहणी केली. त्यात १९९० सालच्या स्थलांतराच्या यादीत मोठ्या प्रमाणात प्रस्तावधारकांची नावे आढळून आली आहेत. तर काहींनी मिळालेली घरे तर काहींनी नोटरी करारावर परस्पर विक्री करुन पुन्हा कुरुंदवाड येथे पुररेषेच्या ठिकाणी वास्तव केल्याचे पुढे आले आहे.

याबाबतचा अहवाल तयार करून तहसीलदार शिरोळ यांच्याकडे सादर करणार असल्याचे कुरुंदवाडचे मंडल अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी सांगितले.