आजरा (प्रतिनिधी) :  आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या अमृतेश्वर मंदिरातील कार्तिकस्वामी दर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अत्यंत दुर्मिळ असणारी कार्तिक स्वामींची मूर्ती फक्त निंगुडगे गावी आहे. कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्रावर या मूर्तीचा दर्शनाचा लाभ होतो अशी आख्यायिका आहे.

दरवर्षी या मंदिरात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  दर्शनासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तसेच कर्नाटक सीमा भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि स्थानिक देवस्थान समिती मार्फत या सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.