कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील दोन यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीज मीटरमध्ये वीज वापराचे रिडींग दिसू नये, या हेतूने वीजमीटरच्या वरील बाजूस छिद्रे पाडून मीटर डिस्प्ले बंद केला आहे.  या ग्राहकांविरूध्द वीजमीटरमध्ये छेडछाड करून १२ लाख रूपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.

महावितरणच्या भरारी पथकाने चंदुर रोड, इचलकरंजी येथील यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहक महावीर मगदूम व वीज वापरदार ज्ञानेश्वर आमने यांच्या वीज मीटरची पंचासमक्ष तपासणी केली. सदर तपासणीत वीजमीटरमध्ये रिडींग दिसू नये, या हेतूने मीटरच्या वरील बाजूस छिद्रे पाडून डिस्प्ले बंद केल्याचे निदर्शनास आले. वीजचोरीच्या उद्देशाने वीजमीटमध्ये छेडछाड केली. सदर वीजचोरीचा कालावधी १२ महिने इतका निर्धारीत करून या कालावधीत ३५ हजार  ३२३ युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम ५ लाख ४० हजार २२९ रूपये  व तडजोड रक्कम रूपये १ लाख ५० हजार इतकी आहे.

चंदुर रोड, इचलकरंजी येथील यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहक श्रीमती संजीवनी मगदूम व वीज वापरदार ज्ञानेश्वर आमने यांनी  वीज मीटरमध्ये उपरोक्तप्रमाणेच छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. सदर वीजचोरीचा कालावधी १२ महिने इतका निर्धारीत करून या कालावधीत ४३ हजार ८५६ युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम ६ लाख ६६ हजार ५६२ रूपये  व तडजोड रक्कम रूपये १ लाख ९० हजार इतकी आहे. दोन्ही ग्राहकांना वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे.

कोल्हापूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक अभियंता नितीन जोशी, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी वर्षा जाधव,  तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी यांनी कारवाई केली.