मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.

या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असून त्यांनाही राज्याचा कारभार माहित आहे, त्यांनी केलेल्या सूचनांवर विचार करु, त्यावर शासनाचे मत घेऊन निर्णय घेऊ, असे परब यांनी म्हटले आहे.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा मु्द्दा समितीसमोर आहे. याशिवाय इतर मागण्या आणि प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी शासनाची तयारी आहे. सरकारची एसटी कर्मचाऱ्यांबाबत नकारात्मक भूमिका नाही. वेतनवाढ द्यायला तयार आहे. कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.