कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आज (शुक्रवार) शिवसेनेच्या वतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अभिषेक घालून साकडे घालण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईमध्ये सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात जिल्हा शिवसेनेच्या वतीने करवीर निवासिनी अंबाबाईला होमहवन करून अभिषेक घालण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उदंड व दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना जिल्हायुवा अधिकारी मंजित माने, अभिजीत बुकशेट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.