नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने वादग्रस्त वक्तव्य करून अनेकवेळा वाद ओढवून घेतला आहे. आताही तिने वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे तिने एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटले आहे. यावरून तिच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.   

कंगना म्हणाली की, सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो, तर या लोकांना माहित होते की, रक्त सांडेल, पण हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचे रक्त सांडू नये, हेही लक्षात ठेवावं लागेल. त्यांनी अर्थातच स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते, भीक होती. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ मध्ये मिळाले.

दरम्यान, कंगना राणावतच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री स्वरा भास्कर, माजी आयएएस अधिकारी, काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. कंगना राणावत याआधी अनेकवेळा वादग्रस्त विधाने करून चर्चेत आली आहे. तिच्यावर बॉलीवूडसह विविध क्षेत्रांतून टीका करण्यात आली आहे.