टोप (प्रतिनिधी) : संभापुर ते पेठ वडगाव मार्गावर असणाऱ्या डी.एन. विंड कंपनीत गेले काही दिवस कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील  वाद चिघळला आहे. याबाबत कामगार संघटनांनी कोर्टात दाद मागितली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असताना व्यवस्थापनाचे अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने मशिनरी खोलण्याचे काम सुरू केले आहे. हे बेकायदेशीर असुन आमची दैय देणी आदी भागवा मगच मशिनरी खोला, अशी आक्रमक भूमिका घेत मशिनरी खोलण्याचे काम कामगरांनी रोखले.

या कंपनीतील कर्मचाऱ्यांना गेले सहा महिने पगार दिलेला नाही, दिपावलीचा बोनस दिला नाही. मग आम्ही जगायचं कसं हा प्रश्न समोर आला आहे. कंपनीने बाहेर गावच्या कामगार आणून मशिनरी काढण्याचे काम सुरू असल्याची कुणकुण कर्मचाऱ्यांना लागली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीमध्ये जाऊन ते काम बंद पाडले. कंपनी व्यवस्थापनास कोणत्याही प्रकारची मशिनिरी हलवण्याची परवानगी नसताना व्यवस्थापन बेकायदेशीर मशिनरी खोलुन बाहेर काढण्याच्या तयारीत आहे असा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.

या कंपनीमधील उत्पादन प्रक्रिया बंद ठेऊन व्यवस्थापनाने गेली काही दिवस कर्मचाऱ्यांची अर्थिक व माणसिक पिळवणूक सुरू केली असून कंपनी बंद करण्याचा घाट घातला आहे. यामुळे २० वर्षे काम करणाऱ्या १३३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी व्यवस्थापनाचे न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी यावेळी केली आहे.