गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावचे ‘लाईव्ह मराठी’चे  पत्रकार अजित यादव यांनी आपली कन्या दिवंगत  राजनंदिनी (वय ७) हिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य गेल्या वर्षी गावातील काही जोडप्यांना वडाचे झाड देवून ‘माझे कुटुंब माझे झाड’ या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. त्याच झाडांचे या जोडप्यांनी चांगल्या पध्दतीने जतन केल्याबद्दल आज  (सोमवार) द्वितीय पुण्यस्मरणानिमित्य त्या जोडप्यांना साडीचोळी, टॉवेल, टोपी देऊन सत्कार केला.

तालुक्यातील तळेमाऊली मंदिर परिसर,  म्हसवे रस्त्याच्या दुतर्फा,  मडिलगे जोतिर्लिंग मंदिराच्या टेकडीवर वृक्षारोपण करून  या अनोख्या उपक्रमाला  दाम्पत्यांनी भरभरून साथ दिली.  गेल्या वर्षात झाडे लावून त्यांचे चांगले संगोपन केले.

अजित यादव म्हणाले की,  कोरोना महामारीत  ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले आहे. गेल्या दोन वर्षात अनेक ठिकाणच्या रस्ता रुंदीकरणामुळे वडाच्या झाडांची कत्तल झाली  आहे. त्यामुळे  पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या वड वृक्षाची नितांत गरज ओळखून माझ्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सत्कारणी लागणारा उपक्रम सुरू केला आहे.  दरम्यान, यादव यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल म्हसवे पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.