राशिवडे (प्रतिनिधी) : कामगार मंत्री  हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांची दिवाळी गोड करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच बोनसची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असून त्यांची सही झाली की, लगेच कामगारांच्या खात्यात बोनस जमा होईल, असे जाहीर केले होते. पण अजूनही मुख्यमंत्र्यांनी या फाइलवर सही केलेली नाही, की खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने कामगारांची चेष्टाच केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे (सिटू) जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे यांनी व्यक्त केली. संघटनेच्या वतीने आवळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम  म्हणाले की,  लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या  वतीने विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांचा मोठा  मोर्चा काढला होता. त्यानंतर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. तरीही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. तर बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळामध्ये जवळपास १३  हजार कोटी रुपये शिल्लक असताना कामगारांना बोनस देण्यात कसलीही अडचण  नाही.

तर येत्या दोन दिवसात खात्यावर बोनस जमा झाला नाही, तर हजारों कामगारांच्या उपस्थित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मोर्चा काढणार असल्याचे इशारा जिल्हा उपाध्यक्ष कॉ. संदीप सुतार यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार,  पन्हाळा तालुका अध्यक्ष भगवान घोरपडे,  करवीर तालुकाध्यक्ष अध्यक्ष आनंदा कराडे,  शाहूवाडी तालुका अध्यक्ष मनोहर सुतार,  भुदरगड तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे,  रमेश निर्मळे,  शिवाजी कांबळे, अशोक सुतार, मोहन गिरी  आदी उपस्थित होते.