कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिलांची वसुली करण्याचे आदेश साखर संचालकांनी साखर कारखान्यांना दिल्याच्या  निषेधार्थ आज (मंगळवार) कोल्हापुरातील बिंदू चौकात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी साखर संचालकाच्या परिपत्रकाची होळी करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 

यावेळी सक्तीने सुरू असलेली वीजबिल वसुली रद्द करावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा,  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला. दरम्यान वीजबिलांच्या वसुलीसंदर्भात साखर संचालकांनी काढलेले आदेश मागे घ्यावेत,  २०१९ च्या धर्तीवर  महापूर नुकसान भरपाई मिळावी, आदी प्रलंबित मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस काँ. नामदेव गावडे, जिल्हा अध्यक्ष वाय. एन. पाटील,  भाकपचे जिल्हा अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, संजय पाटील, बाळासो पाटील,  दिलीप पोवार, सदाशिव पाटील, पदाधिकारी,  कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.