बेंगलोर (वृत्तसंस्था) : कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार (वय ४६) यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांना धक्का बसला आहे.

कर्नाटकमधील हनूर तालुक्यातील मारो गावात राहणाऱ्या पुनीत यांच्या एका चाहत्याचे निधन झाले आहे. पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकून ३० वर्षीय मुनियप्पा या चाहत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुनियप्पा पुनीत यांच्या निधनाचे वृत्त ऐकून रडू लागला. दरम्यान, तो अचानक जमिनीवर कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याचे निधन झाल्याचे सांगितले.

दुसरीकडे पुनीतच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकमधील अथानी गावात घडली आहे. या चाहत्याचे नाव राहुल गादिवादारा असे आहे. त्यांने पुनीतचा फोटो फुलांनी सजवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.