कागल (प्रतिनिधी) : राजकारणाच्याही पलीकडे आमची मैत्री अबाधित आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. सार्वजनिक जीवनात जरूर पंचवीस-तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात राहिलो. परंतु; त्याची कटुता कधी व्यक्तिगत जीवनात येऊ दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.   

कागलमध्ये शिवराज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित श्री गणेश अवॉर्ड – २०२१ च्या बक्षीस वितरण व गुणगौरव सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा माणिक माळी उपस्थित होत्या.

ना. मुश्रीफ म्हणाले की, मी आणि संजयबाबा एकत्र शिकलो, खेळलो आणि वाढलोही. पुढे राजकारणात विरोधक म्हणून लढलो. परंतु ती कटुता आणि सूडाची भावना व्यक्तीगत आयुष्यात कधीच येऊ दिली नाही.

संजयबाबा घाटगे म्हणाले की, निवडणुकीला मी किती वेळा उभारायचं, किती वेळा पराभूत व्हायचं ? असे सांगतानाच महाराष्ट्रात माझ्या पराभवाचं रेकॉर्ड झालं असेल. जास्तीत- जास्त वेळा पराभूत होणारा उमेदवार म्हणून माझी नोंद घ्या, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

स्वागत व प्रास्ताविक संयोजक, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी केले. शिवराज पतसंस्थेच्यावतीने श्री गणेश अवॉर्ड स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. शहरातील गणेशोत्सव प्रबोधनाच्या दिशेने नेऊन विधायक उपक्रमांना चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.

सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेतील विजेते असे :-

धर्मवीर संभाजीराजे चौक मित्र मंडळ, बिग स्काय ग्रुप – लक्ष्मी चौक, भगतसिंग स्पोर्ट्स-  रोटे गल्ली, शिवप्रेमी युवा मंच – मौलाली माळ, इंडियन स्पोर्ट्स- माळभाग व खच्याक प्रेमी, लोहार गल्ली.

घरगुती मंगळागौरी सजावट स्पर्धा :-

राधिका नवनाथ पिष्टे – हणबर गल्ली, जयश्री अनिल वरुटे – कोष्टी गल्ली,  सुप्रिया सुरेश रेळेकर – सोमवार पेठ, सुलोचना शिवाजी लोहार – कोष्टी गल्ली,  प्रतीक्षा संदीप मोरे- सोमवार पेठ, मालुताई सखाराम रानगे – धनगर गल्ली, अश्विनी संदीप सणगर – सणगर सोसायटी, शुभदा पांडुरंग सनगर – सनगर गल्ली.

घरगुती गणेश सजावट आकर्षक रोषणाई : –

अभिज्ञ योगेश तिवारी- जयसिंगराव पार्क, सौ.मेघा दिलीप काळे- कोष्टी गल्ली, विक्रम पांडुरंग पारदोळे -काळम्मावाडी वसाहत, सौरभ संजय लोखंडे -मातंग वसाहत, श्रीराम विनायक ठाकूरदेसाई -दत्त मंदिर रोड.

यावेळी डॉ. कु. प्रिया कुमार शिंगे, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. नवनाथ मगदूम, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे या कोरोना योद्ध्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. तसेच सरोजिनी नाईक, भारती कांबळे, अशोक बुगडे, शंकर संकपाळ, राजकुमार माने, जगन्नाथ भोसले, शिवाजी गवळी, जहांगीर शेख या परीक्षकांचेही सत्कार झाले.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कर्नल विलास सुळकुडे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, माधवी मोरबाळे, इगल प्रभावळकर, सागर कोंडेकर, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, संजय चितारी, संग्राम लाड, प्रवीण काळबर,  मोहन तोरगलकर, राजन शिंदे, प्रकाशराव चव्हाण, पोपट कांबळे, शिवाजीराव पालकर, सुभाष करंजे, डॉ. अमोल चौगुले, अनिल खोत आदी  उपस्थित होते.