चंद्रपूर (वृत्तसंस्था) : भाजप-शिवसेना सरकारने २०१५ साली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. या निर्णयाचा जिल्ह्यातील दारू विक्रेते आणि बार व्यावसायिक यांना चांगलाच फटका बसला होता. काही दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे दारू विक्रेते सुखावले. जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोट्यवधींची मद्यविक्री झाली. एका बारमालकाने याचा आनंद साजरा करताना विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेची चक्क आरती केली. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अ‍ॅड. परोमिता गोस्वामी यांनी दारूबंदी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. ६ वर्षे दारूबंदी असल्यामुळे दारू विक्रेते अडचणीत होते. जिल्ह्यातील दारूबंदी विजय वडेट्टीवार यांनी उठवली आहे. तब्बल सहा वर्षांनंतर मद्यविक्री सुरू झाली आहे. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपापल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला.

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले, अशी भावना दारू विक्रेत्यांनी व्यक्त केली. तर ग्रीन पार्क बारचे मालक गणेश गोरडवार यांनी चक्क मंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बिअर बारमध्ये लावून त्यांची आरती केली. मद्यप्रेमींनी मागील ३ दिवसात तब्बल १ कोटींची दारू रिचवल्याची माहिती आहे, याचाच आनंद म्हणून त्यांच्या छायाचित्राची आरती केली. जो आमचे पोट भरतो तोच आमचा देव असल्याची आहे. दारूविक्रेत्यांच्या जीवनात वडेट्टीवार यांनी पुन्हा आनंद भरला आहे, त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया गोरडवार यांनी दिली आहे. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.