कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा व्यापारी असोसिएशनने शहरातील व्यापाऱ्यांना सोशल मिडियाद्वारे बंद असलेले व्यापार सुरु करावेत असे आवाहन केले होते. त्यानुसार आज (रविवार) शहरातील गुजरी आणि राजारामपूरी येथे सर्व व्यापारी आणि कामगारांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्या (सोमवार) पासून आपले व्यवसाय सकाळी ९ ते ४ या वेळेत सुरु ठेवावीत असा निर्णय घेण्यात आला. मात्र, पोलिसांनी या व्यावसायिकांना नोटीसा पाठवल्या असल्याचे किरण नकाते यांनी सांगितले.

त्यामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक प्रमोद जाधव यांनी नोटीसामध्ये म्हटले आहे की, मी प्रमोद जाधव पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे-कोल्हापूर, आम्हास प्राप्त असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७४ चे कलम १४९ मधील अधिकार व शक्तीचा वापर करुन आपणास या नोटीसव्दारे आदेशित करत आहे. की, कोरोना विषाणू (कोव्हीड १९) संसर्ग साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साथ रोग अधिनियम १८९७ मधील कलम २ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारान्वये, मा. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर. यांनी त्यांचे कार्यालयाकडील जा. क्र. नैआ/कोरोना विषाणू/ आरआर / ३४४ / २०२१, दिनांक ०५-०६-२०२१ अन्वये, पुढील आदेशापर्यत प्रतिबंधीत आदेश जारी केलेले असून सदर आदेशाची मुदतवाढ जा. क्र. नैआ/कोरोना विषाणू/आरआर / ३९८ / २०२१, दिनांक ०२-०७-२०२१ अन्वये, पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

त्याबाबत पोलीस अधीक्षकांनी यांनी २९-०६-२०२१ व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, कोल्हापूर शहर यांनी दिनांक ०३-०७-२०२१ रोजी व्यापारी असोशिएसनमधील पदाधिकारी यांची बैठक घेऊन बैठकीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना सुरु ठेवणेबाबत बंदी आदेश व जमावबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे आपल्या संघटनेमार्फत परवानगी नसलेल्या आस्थापना उघडण्याचा प्रयत्न करु नये. व्यापक लोकहितार्थ प्रशासनाने जारी केलेले निर्बंध झुगारुन आस्थापना चालू ठेवून सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात घालण्यासारखी कृती केल्यास आपल्याविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायदयातील तरतूदीप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तसेच सदरची नोटीस पुरावा म्हणून मा. न्यायालयामध्ये ग्राहय धरण्यात येईल याची समज घ्यावी. अशी नोटीस आज माझ्या सही शिक्क्यानिशी देत असल्याचे पोलीस निरिक्षक जाधव यांनी दिल्याचे किरण नकाते यांनी सांगितले.