कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे, मात्र त्याला आम आदमी पार्टीने विरोध केला आहे. ‘आपला गणेशोत्सव – आपला लढा’ ही मोहीम जाहीर करीत या मोहिमेद्वारे कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळे, तालीम संस्थांच्या बैठका घेऊन या निर्बंधाविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ‘आप’चे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष – संदीप देसाई यांनी आज (मंगळवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी देसाई म्हणाले की, सरकारच्या या निर्बंधामुळे सलग तिसऱ्या वर्षी गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. तसेच गणेशोत्सवासंदर्भात काम करणाऱ्या सर्व घटकांचे मनोधैर्य खचले आहे. मंत्री गोकुळची निवडणूक व्हावी यासाठी कोर्टात जातात, अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनात हजारो लोक जमा होतात. शिवसेनेच्या बडतर्फ मंत्र्यांना मंदिराच्या आवारात शेकडो लोकांची सभा घेताना कोरोनाचे भान राहत नाही. त्यामुळे एकीकडे सरकारचे मंत्री नियमांना पायदळी तुडवत असतील तर दुसरीकडे गणेशोत्सवात निर्बंध का ?  कोल्हापूरची जनता हा प्रकार खपवून घेणार नाही. मागील तीन वर्षांपासून अशा प्रकारचे विविध निर्बंध लादण्याचे काम होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठी आर्थिक उलाढाल होते. लाईट, मंडप, डेकोरेटर, नारळवाले, सजावटवाले, फूलवाले यासारखे छोटे व्यापारी त्यावर अवलंबून असतात. मात्र या निर्बंधामुळे ते अडचणीत येत आहेत. त्याशिवाय मूर्तीकाम करणाऱ्या कारागिरांना आणि कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर लादलेल्या या निर्बंधाच्या विरोधात पक्षामार्फत ‘आपला गणेशोत्सव – आपला लढा’ ही मोहीम हाती घेतली आहे. या लढ्यात आमचा पक्ष सर्व घटकांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील.

या पत्रकार परिषदेस पक्षाचे युवा अध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, मोईन मोकाशी, सूरज सूर्वे, अमरजा पाटील, विशाल वठारे, आदम शेख, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.