कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील नाल्यात झालेल्या अनधिकृत बांधकाम हटवावे, यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेचे उप नगररचनाकार रमेश मस्कर यांनी हे अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. दोन आठवडे उलटूनही अतिक्रमण न काढल्याने अखेर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नगररचनाकार महाजन यांना सोमवारी भेटून धारेवर धरले. अखेर महाजन यांच्या आदेशानुसार आज (मंगळवार) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज नाल्यातील बांधकाम पाडून टाकले. यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने सर्व संबंधितांना आदेश देत नगररचनाकार महाजन यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, महापालिकेचे उपनगररचनाकार रमेश मस्कर, उपअभियंता बाबुराव दबडे, कनिष्ठ अभियंता फुलारी हे अतिक्रमण व नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन अतिक्रमणस्थळी पोहोचले. त्यांनी संयुक्त कारवाई करत नाल्यातील बांधकाम जमीनदोस्त केले.

शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ज्यामुळे नाल्यालगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरते. अशा सगळ्या बांधकामांविषयी यापुढे महापालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

या वेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, प्रथमेश सूर्यवंशी, पवन भांबुरे, राज कोरगावकर, विजय भोसले आदी उपस्थित होते.