कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील नाल्यात अनधिकृत बांधकामांमुळे येथील नागरिकांच्या घरात दरवर्षी पाणी शिरते. याची  तक्रार महापालिकेकडे वर्षभरापासून प्रलंबित आहे. महापालिकेचे उप नगररचनाकार रमेश मस्कर यांनी जागेवर भेट देऊन संबंधित अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. त्याला दोन आठवडे उलटूनही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढले नाही तर सर्व नागरीक नगररचना कार्यालयात ठिय्या मांडतील, असा इशारा आपतर्फे देण्यात आला आहे.

आज (सोमवार) आम आदमी पार्टीने परिसरातील नागरिकांनी घेऊन राजारामपुरी येथील विभागीय कार्यालयात नगररचनाकार महाजन यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तर या अतिक्रमणाबाबत उद्या दुपारपर्यंत सर्व संबंधितांना आदेश दिला जाईल, अशी ग्वाही नगररचनाकार महाजन यांनी दिली. जर उद्या आदेश होऊन अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाले नाही तर बुधवारी तुमच्या कार्यालयात सगळा संसार घेऊन नागरिक ठिय्या मांडतील, असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.

यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, शहर युवाध्यक्ष मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, पवन भांबुरे, विशाल वठारे, राज कोरगावकर आदी उपस्थित होते.