नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये कोल्हापूरची सुकन्या राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये तिने देशाला पहिले सुवर्णपदक प्राप्त करून दिले आहे. अंतिम फेरीत राहीने ४० पैकी ३९ गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले.

२५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत राहीने फ्रेंच व रशियन नेमबाजांना मागे टाकत ही कामगिरी केली. फ्रान्सच्या मॅथिलडे लामोलेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला ३१ गुण मिळाले. अंतिम फेरीत मनु भाकेर सातव्या स्थानावर राहिली.

या वर्ल्डकपमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले. यापूर्वी भारताने एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. राहीने मिळविलेले सुवर्णपदक हे वर्ल्डकपमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. यामुळे राहीच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.