शिवसेनेने ‘मनसे’ आळविलेला ‘राहुल’ राग…

कोल्हापूर (विवेक जोशी) : ‘पप्पू’ म्हणून हिणविल्या गेलेल्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे प्रमाणपत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिल्याने भाजपवाल्यांच्या भुवया उंचावल्यात. राजकीय पंडितही डोके खाजवू लागलेत. साहजिकच आहे, वर्षानुवर्षे कॉंग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडविल्यानंतर एकदम राहुल गांधी यांच्यातील ‘क्षमते’चा साक्षात्कार राऊत आणि राज ठाकरे यांना होणे ही राजकीय मजबुरी म्हणायची की मोदींविरोधातला आवाज बुलंद करायचा प्रयत्न हे त्यांनाच माहीत…

राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या या वक्तव्याने काही का असेना, निष्ठावंत कॉंग्रेसजन नक्कीच सुखावले असतील. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी तर बऱ्याच वर्षांनी शिवसेनेला उपरती झाली आहे, ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भाजपची सत्तेची भूक इतकी वाढलीय की, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सर्व राज्यात आपलीच सत्ता असावी अशा ईर्ष्येने अमित शहा यांचेसह इतर नेत्यांना पछाडलंय. प्रसंगी मित्रपक्षांनाही अंगावर घेण्याची तयारी पक्षाने केलीय. सध्या भाजपा विविध राजकीय पक्षांचा क्र. १ चा शत्रुपक्ष बनलाय. अस्तित्वाचा प्रश्न असेल तर कोणीही परिस्थितीचा मुकाबला प्राणपणाने करण्यास सज्ज होतो. शिवसेनेचेही हेच झालेय. त्यामुळे युतीत राहायचे, सत्तेचे फायदे मिळवायचे आणि जनतेसाठी भाजपला विरोध करायचा, अशी रणनीती (?) अवलंबण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाताहत झालीय. सुरुवातीला बऱ्यापैकी यश मिळविणाऱ्या मनसेने सर्वच मुद्द्यांबाबत धरसोडीची भूमिका घेतल्याने जनाधार घटत गेला. राज ठाकरे यांचे पक्षबांधणीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष पक्षाचे मोठे नुकसान करून गेलंय.

अमरावतीत राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सर्वपक्षीयांतर्फे सत्कार झाला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळताना ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ असे विधान केले. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेत्यांना सुखावणारे वाटले असले, तरी शिवसेना आणखीनच दुखावली जाणे साहजिक होते. त्यातच मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केलीय. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राहुल गांधी यांनी गुजरात पिंजून काढायला सुरुवात केलीय. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. गुजरातमध्ये भाजपच्या पराभवासाठी सर्वपक्षीय एकत्र आलेत. राहुल गांधी यांच्या सभांना मोठी गर्दीही होत आहे. त्यामुळेच की काय, भाजपच्या विरोधात बोलण्याची एकही संधी ना सोडणाऱ्या संजय राऊत आणि राज ठाकरे यांनीही राहुल गांधी यांचे जाहीर कौतुक करीत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कधी नव्हे ते शिवसेना-मनसे एका सुरात बोलू लागलेत. आता हा ‘राहुल’ राग हे दोन्ही पक्ष किती दिवस आळवताहेत, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा