गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीसाठी आज (शुक्रवार) मतदान पार पडले. तालुक्यात उच्चांकी असे ८०.११% इतके मतदान झाले. या वाढीव मतदानाने मात्र उमेदवाराच्यात धाकधूक वाढली आहे. मतदानावेळी महिलांसह पुरुषांचा सहभाग लक्षणीय दिसून आला.

सध्या शेतातील कामे सुरू असल्याने अनेकांनी सकाळच्या सत्रात मतदान करणे पसंत केले. दुपारच्या वेळी मात्र मतदान केंद्रात शांतता पहायला मिळाली. तसेच मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराची थर्मल स्क्रिंनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात येत होती. तसेच मतदारांच्या हातावर सॅनिटायझर देऊन निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. सकाळपासून प्रत्येक उमेदवारांची मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी धावपळ चालू होती. एकूणच तालुक्यातील अनेक मातबरांचे भवितव्य मतदान यंत्रात आज बंद झाले असून सर्वांना आता १८ जानेवारीची प्रतीक्षा लागणार आहे. मात्र, कार्यकर्ते आकडेमोड करण्यात मग्न झाल्याचे दिसून आले.