टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवंगत संजित विलासराव जगताप हे दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोरोना विषाणू संसर्गामुळे संजय घोडावत कोविड सेंटर येथे उपचार घेत असताना मृत झाले होते. आज (बुधवार) त्यांच्या कुटुंबास शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जमा झालेली ४ लाख २१००० हजारांची आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली.

यामध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कडून १ लख १ हजार, तसेच गांधीनगर पोलीस स्टेशनकडून ४० हजार अशी रक्कम आर्थिक मदत स्वरुपात करण्यात आली.

त्याचप्रमाणे शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसीमधील उद्योजक मेनन कंपनी, सरोज कास्टिंग, यश मेटल तसेच इतर कंपनी, शोरूम आणि शिरोली, टोप, भुये या ग्रामपंचायतीकडून आर्थिक मदत करण्यात आलेली होती. या आर्थिक मदतीची एकूण रक्कम ४ लाख २१,००० हजार रुपये दिवंगत संजीत जगताप यांची पत्नी व मुले यांच्याकडे तिरुपती काकडे, (पोलीस अधीक्षक कोल्हापूर), डॉक्टर प्रशांत अमृतकर (उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग), पोलीस निरीक्षक तानाजी सावंत (स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर), किरण भोसले (सहाय्यक पोलीस निरीक्षक), अतुल लोखंडे (पोलीस उपनिरीक्षक शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन) तसेच स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष राजू पाटील, श्री सोहम गिरगावकर संचालक व इतर पदाधिकारी तसेच पोलीस स्टेशनमधील कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.