दाजीपूर पर्यटन विकासासाठी २५ कोटींची तरतूद : मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
285

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणून युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये नोंद असलेल्या राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याकरिता भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आज (शुक्रवार) वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ११० कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देऊन पहिल्या टप्प्यातील कामाकरिता २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

या वेळी दाजीपूर अभयारण्याच्या विकासाकरिता विविध मागण्या केल्या. यामध्ये प्रामुख्याने हत्ती महल येथे हत्ती सफारी सुरू करणे, राधानगरी धरण येथे नौकाविहार (बोटिंग) सुविधा निर्माण करणे व जेटी बांधणे, राऊतवाडी, रामनवाडी धबधबा परिसर सुशोभिकरण करणे, राधानगरी येथे पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट बांधणे, बेनजीर व्हिला परिसर दुरुस्ती करून लेझर शो करणे व बोटिंग सुविधा निर्माण करणे, राधानगरी व काळम्मावाडी धरण येथे गार्डन उभारणे व लाईट शो करणे, शिवगड किल्ला दुरुस्त करणे, अभयारण्यातील दुर्मीळ वनस्पती, पशु-पक्षी व प्राण्यांवर संशोधन करण्याकरिता संशोधन केंद्र उभारणे, पर्यटकांकरिता बस खरेदी करणे,  अभयारण्य परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, माळेवाडी येथे नौकाविहार (बोटिंग) सुविधा निर्माण करणे,  दाजीपूर येथे तंबू निवास बांधणे, वन विश्रामगृह बांधणे, डॉरमेट्री बांधणे आदी मागण्या केल्या.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राधानगरी – दाजीपूर वन्यजीव अभयारण्य परिसर हा अतिशय सुंदर परिसर असून येथील पर्यटन विकासाकरिता चालना मिळावी याकरिता शासनाकडून आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच पर्यटन विकास आराखड्यातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करून हत्ती महल परिसर व राऊतवाडी धबधबा परिसर यासह राधानगरी येथे नौकाविहार करणे व लेझर शो बसविणे याकरिता पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश पर्यटन व वन विभागाच्या सचिवांना दिले.

यावेळी मुख्य सचिव श्री. संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार श्री. अजॉय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सचिव वने मिलिंद म्हैसकर, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अभिजित सिंग, वन्यजीव अधिकारी विशाल माळी यांच्यासह प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here