सौंदर्यवृद्धीसाठी नारळाचा असाही उपयोग…

0 5

नारळाचा वापर खाद्य पदार्थात जसा होतो तसा तो सौंदर्यवृद्धीसाठीही होतो. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला किस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून त्वचा मुलायम बनवता येते. नारळामध्ये प्रामुख्याने एन्झाइम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज आदींचा समावेश असतो. याशिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इन ऑर्गेनिक तत्त्वे असतात. नारळ त्वचेबरोबर केसांना कसे पोषक ठरू शकतो याविषयी जाणून घेवू या…  

केस तसेच सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळून लावावे. यामुळे केस मुलायम तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांची वाढ व्हायला लागते. याशिवाय, त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही नारळाच्या पाण्याचा उपयोग करता येतो. नारळाचे पाणी अतिशय पोषक आहे व ते त्वचेत शोषले गेल्यामुळे त्वचेला टवटवीतपणा येतो. यासाठी निस्तेज आणि कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा. याशिवाय नारळाचे पा‍णी व दूध त्वचेच्या क्लिंझिंगसाठीही उपयुक्त ठरतात.

कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध सर्वोत्तम ठरते. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते. तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केला तर, त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते. खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध म्हणजे एक वरदानच आहे. तसेच फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरावे. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. 

आयुर्वेदानुसार नारळाचे तेल ‘केश्य’, अर्थात केसांचे आरोग्य वाढवणारे, केस गळणे थांबवणारे आणि केसांची वाढ करणारे आहे. बाजारात उपलब्ध असलेले नारळाचे तेल सुक्या खोबऱ्यापासून काढले जाते. मात्र, आयुर्वेदात नारळाचे तेल तयार करण्याची कृती पूर्णपणे वेगळी आहे. नारळाचे तेल ओल्या खोबऱ्यापासून तयार केले जाते. असे तेल तयार करण्यासाठी ओला नारळ बारीक वाटून घ्यावा आणि त्यापासून दूध काढून घ्यावे. हे दूध मंद आचेवर उकळत ठेवावे. यामुळे यातील पाण्याचा अंश उडून जाईल आणि निव्वळ तेल मागे उरेल. हे तेल गाळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेले तेल वापरल्यामुळे केस गळायचे थांबतात व केसांची वाढ व्हायला लागते. केसांबरोबरच नारळाचे तेल त्वचेसाठीही उपयुक्त आहे. कोरड्या पडलेल्या अंगाला नारळाच्या तेलाने मसाज करावा. नारळाच्या तेलाचा वास उग्र वाटत असल्यास त्यात लव्हेंडर ऑइल आणि जिरेनियम ऑइलचे ४-५ थेंब मिसळून घ्यावेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More