लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका – जिल्ह्यात युतीमध्ये दुहीचे बीज !

0 3

लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदरच युतीमध्ये दुहीचे बीज पेरले गेल्याचे चित्र आहे. किमान कोल्हापूर जिल्ह्यात असेच होणार हे अगोदरच स्पष्ट झाले होते. सत्तेसाठी सुंदोपसुंदी होते, हे गृहीतक आहेच. लोकसभा निवडणुकीत अगदी मनापासून युती झाली आहे असे दोन्ही पक्षांचे नेते कितीही दावा करत असले, तरी तशी वस्तुस्थिती नाही, हे समजायला फार काळ जावा लागणार नाही असेच दिसते.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला किंवा किमान तसे चित्र किंवा हवा तयार करण्यात निश्चितच यश आले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा प्रचारातील सहभाग किती मनापासून होता हे २३ मेला स्पष्ट होईलच. युतीत मतभेद आणि मनभेद दोन्ही आहे. सत्तेचा स्वार्थ त्याचे प्रमुख कारण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आमदार आहेत. कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ व शाहूवाडी या सहाही विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान म्हणून या सहा जागा शिवसेनेकडे राहतील अशी शक्यता आहे. इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. या दोन्ही जागा त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय कागल, चंदगड या दोन जागा विरोधकांकडे आहेत. त्यावर भाजप दावा सांगू शकतो. पण एवढ्यावर भागणं कठीण आहे.

गत निवडणुकीत भाजपाने कोल्हापूर उत्तरमधून अचानकपणे उमेदवार दिला. मोदी लाट असल्यामुळे या उमेदवाराला चांगली मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात शिरकाव करण्याचा भाजपचा हेतू दिसतो. याशिवाय राधानगरी मतदारसंघातही घडामोडी होण्याची शक्यता अधिक आहे. सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची मानसिक तयारी नाही. कार्यकर्त्यांपेक्षा रिंगणात उतरण्याची इच्छा असणाऱ्यांनी अगोदरच ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधले आहे. त्यामुळेच ‘कोल्हापूर उत्तर’च्या निमित्ताने युतीत दुहीची बीजे पेरली गेली आहेत.

हवा किंवा वातावरण निर्माण करण्यात भाजप-सेनेचा कोणी हात धरू शकत नाही. वातावरण निर्मितीमुळे भल्याभल्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. हवा निर्माण करूनही यश मिळाले नाही तर त्याचे समर्थन करणारी कारणेही तयार असतात. एक तर मित्रपक्षावर दोष ढकलायचा किंवा आम्ही पैशाने मागे पडलो असे सांगत सुटायचे. असा अनुभव यापूर्वीही आला आहे. गावाचे धुणे किती दिवस धुवायचे, हे जरी बरोबर असले, तरी केवळ हवा करून किंवा वातावरणनिर्मिती करून निवडणुका जिंकता येत नाहीत. भाजपाची पुढची दिशा काय असेल याचा अंदाज सेनेच्या नेत्यांना नक्कीच असणार आहे.

पण हल्ली मतदार अधिकच डोळस आणि सजग झाला आहे. मतदार प्रत्येकाचे मूल्यमापन करत असतो, कोण किती पाण्यात आहे हे त्याला पक्के माहीत असते. प्रत्येक वेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे सांगून मतदाराला  आठवण करून देण्याची गरज नसते. सत्तेच्या या साठमारीत पुढील काही महिन्यात बऱ्याच घडामोडी होणार आहेत. ते पाहून मतदारांवर डोळे विस्फारण्याची वेळ येणार आहे. ‘विश्वास’ या मुख्य मुद्द्यावर युती झाली असे सांगितले जात असले, तरी युतीत अविश्वासाचे, दुहीचे बीज पेरले गेले आहे हे मात्र निश्चित…

-ठसकेबाज

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More